काव्यधारा महोत्सव -२०२२ नोएल च्या प्रांगणात उत्साहात साजरा…
साहित्य समाजाचा आरसा आहे आणि आरशात समाजातील वेगवेगळे प्रतिबिंब दाखविण्याची नैतिक जबाबदारी साहित्यिकांची असते म्हणूनच योग्य संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज माननीय शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर मॅडम यांनी ओळखली.काव्यधारा कार्यक्रम अधिकारी कार्यालय जि. प. माध्यमिक अकोला व महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने काव्यधारा महोत्सव -२०२२ चे नोएलच्या प्रांगणात दि.३/०२/२०२२ व ०४/०२/२०२२ ला आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुचिता पाटेकर मॅडम, शिक्षणाधिकारी जि. प. (माध्य), अकोला, प्रमुख उपस्थिती श्री दिनकर गावंडे (ज्येष्ठ कवी), विशेष उपस्थिती मा. श्री अनोश मनवर सर (प्राचार्य ,नोएल स्कूल, CBSE बोर्ड, अकोला), मा.सौ.अर्पणा डोंगरे मॅडम (प्राचार्या ,नोएल स्कूल स्टेट बोर्ड, अकोला) तसेच मा. श्री अनुल मनवर सर (मुख्याध्यापक , नोएल स्कूल स्टेट बोर्ड प्राथमिक, अकोला) उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व काव्यसुमनांनी स्वागत करण्यात आले तसेच नोएल शाळेचे संस्थापक स्वर्गीय श्री विजय मनवर सरांचे ‘आभाळमाया’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मान्यवरांना भेटवस्तूच्या स्वरूपात शाळेचे प्राचार्य श्री अनोश मनवर सरांच्या हस्ते देण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पेठे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणामधून शिक्षकांमधील दडलेल्या कवींना शुभेच्छा दिल्या व काव्यधारा महोत्सवास सुरुवात झाली.
काव्यधारा महोत्सव ही संकल्पना डॉ. सुचिता पाटेकर मॅडम यांच्या कल्पनेतून साकारण्यात आली. या कार्यक्रमात १४५ शिक्षक कवीं/कवयित्रींनी सहभागी होऊन आपल्या काव्यरसाशी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. अलका बोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. श्री प्रेमदास राठोड सरांनी केले. तसेच श्री सुहास देशपांडे , श्री श्याम कावरे व नोएल शाळेच्या शिक्षक कर्मचारी वर्ग यांचा विशेष सहभाग लाभला. अशाप्रकारे काव्यधारा महोत्सव – २०२२ ची सप्तसुरांनी सुरमय सांगता झाली.